मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सैनिकांच्या नावावर मत मागितल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत आले आहेत. मंगळवारी औसामधील ( जि. लातूर) सभेत मोदींनी सैनिकांच्या नावावरून मतदान करण्याचे नवमतदारांना आवाहन केले होते. याबाबत निवडणूक आयोगाने लातूर निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मंगळवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अशा स्थितीत प्रचार शिगेला पोहोचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवमतदारांना भावनिक आवाहन केले.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी
एकविसाव्या शतकातील हा मतदार पहिल्यांदाच मतदान करून देशाचे सरकार निवडणार आहे. त्यांनी आपल्या जीवनातील पहिले मत आपल्या पहिल्या कमाईसारखेच देशासाठी द्यावे, असे पंतप्रधान यांनी मतदारांना आवाहन केले. या पहिल्यांदा मत देणाऱ्या नवमतदारांचे मत पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी मिळेल का, अशी त्यांनी मतदारांना साद घातली होती.
मोदींनी हा नवमतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. विविध राजकीय पक्ष आणि सजग नागरिकांनी मतांसाठी सैनिकांचा वापर होत असल्याची तक्रार केली होती. निवडणुक आयोगाने लातूर निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे. त्याबाबत आचारसंहिता भंग सिद्ध झाल्यास कठोर कावाईचे निर्देश दिले आहेत.