मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, याबाबत मराठा समाजचे मी अभिंनदन करतो , पण मराठा समाजापेक्षा अधिक मागास असलेल्या मुस्लीम समाजावर या सरकारने अन्याय केला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली.
मराठा आरक्षणावरील उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आझमी यांनी सभागृहात मुस्लीम आरक्षणाच्या मागणीचा फलकही परिधान केला होता. सर्वात मागास असलेल्या मुस्लीम समाजाला मुद्दामहून हे सरकार डावलत आहे. आघाडी सरकारने शिक्षणात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढला नाही, कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, असेही त्यांनी सांगितले.
आजही मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृहात मुस्लीम आरक्षणाबाबत काहीही वक्तव्य केले नाही. या पक्षांना केवळ मुस्लीम समाजाची मते हवी आहेत, असा संतापही आझमी यांनी व्यक्त केला.