बुलडाणा - 'पुन्हा आणुया आपले सरकार' असे घोषवाक्य लिहलेला भाजपचा टीशर्ट घालून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता काँग्रेसचा टीशर्ट घालून एका २१ वर्षींय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाचे नाव सतीश मोरे (वय २१, रा. धाड जि. बुलडाणा) असून त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज ही घटना समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव तालुक्याच्या खातखेळ गावामधील 35 वर्षीय तरुणाने 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहिलेला भाजपचा टी शर्ट घालून आपल्या शेतात गळफास घेतल्याची खळबळजनक घटना 13 ऑक्टोबरला समोर आली होती. राजू ज्ञानदेव तलवारे असे मृताचे नाव होते. तो कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांचा समर्थक होता असे सांगण्यात येत होते. त्याचप्रमाणे चिखली मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार आमदार राहुल बोन्द्रे यांचा 'मी राहुलभाऊ समर्थक' नावाचा टी शर्ट घालून सतीश मोरे या तरुणाने आत्महत्या केली आहे. घातलेल्या कापड्यांवरून मृत सतीश हा काँग्रेस उमेदवार राहुल बोन्द्रे यांचा समर्थक असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून सतीश हा असेच टी शर्ट घालून फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
![Young man commits suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4779728_thumbnai.jpg)
हेही वाचा - 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न
मृत सतीश मोरे हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जातो म्हणून घरी सांगून गेला होता. तो धाड येथील चिवडा विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे चिवडा तयार काम करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. कामावरून घरी न आल्याने सर्वत्र शोध घेतल्यानंतर तो कुठेही मिळून आला नाही. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह धाड गावाच्या बाहेर दूध डेअरीजवळील सागवानाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच खळबळ उडाली. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.