बुलडाणा - जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडून आज (23 मार्च) एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी 23 मार्च 2020 ला बुलडाणा शहरामध्येच पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतर कोरोना जिल्ह्यामधून नष्ट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र तसे न होता आता पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.
3 महिने होता कडक लॉकडाऊन-
देशात कोरोना आल्याने मार्च महिन्यापासून में महिन्यापर्यंत अडीच ते तीन महिने कडक लॉकडाऊन करण्यात आले होते.या लॉकडाऊन मध्ये सगळेच आप-आपल्या घरात होते.त्यानंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली.व काही शर्ती अटीवर देशाचा कारभार सुरू करण्यात आला.सध्या ही बुलडाणा जिल्ह्यात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व कारभार सुरू आहे.तर 6 वाजेच्या नंतर जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आलेली आहे.
कोट्यवधी रुपयांचे नुकसान-
कोरोनामूळे देशात लॉकडाऊन लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवस्थेवर मोठ्ठा परिणाम झाला शिवाय बुलडाणा जिल्ह्यात देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य; ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस
10 ऑक्टोबर 2020 रोजी बुलडाणा जिल्हा झाला होता कोरोनामुक्त-
गेल्या वर्षभरामध्ये बुलडाणेकर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. यात सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, एनजीओ, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात इतर शहरांच्या तुलनेत कोरोनाची लागण कमी झाली होती.व एकेकाळी 10 ऑक्टोबर 2020 रोजी बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता.यादिवशी एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. तरीसुद्धा गेल्या वर्षभरामध्ये 240 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावे लागले. तर 30 हजार 613 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 25 हजार 8 रुग्णांना सुट्टी देण्यात आली.कोरोनामुळे अनेकांनी आपले आप्तस्वकीय व जवळचे मित्र यात गमावले. अनेकांच्या अंत्यविधीत घरच्यांना सुद्धा सामील होता आले नाही.
राज्यात 9 मार्चला तर बुलडाणा जिल्ह्यात 23 मार्चला मिळाला होता पहिला रुग्ण-
राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च 2020 रोजी पुण्यात आढळून आला होता. तर बुलडाणा जिल्ह्यात 23 मार्च रोजी मृत्यू पावलेल्या इसमाचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. या घटनेची वर्षपूर्ती होत आहे.बुलडाणा वर्षभर कोरोनाचा हॉटस्पॉट असलेलं शहर होतं. मात्र मागच्या ३ महिन्यात महिन्यात संसर्ग कमी होत असतांना पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं, अन संपूर्ण बुलडाणा जिल्हा आता परत लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे.
हेही वाचा - रायगडमध्ये महिलेने धावत्या एसटी बसमध्ये दिला बाळाला जन्म