बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. यामध्ये विवाहबाह्य संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह एकास अटक केली असून प्रियकर फरार आहे.
5 नोव्हेंबरला मातमळ गावाच्या पूलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. आकाश दिलीप तायडे, असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या खिशामध्ये औषधी गोळ्या मिळाल्या होत्या. या गोळ्याची सविस्तर माहिती घेतली असता, त्या शासकीय रुग्णालयातून वाटप केल्याचे निर्दशनास आले. या गोळ्या वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रुग्णालयातील असल्याचे समोर आले.
हेही वाचा - पिकांबरोबर स्वप्नेही वाहली; कर्जाचा डोंगर वाढला, २ मुलांचे शिक्षण डोळ्यासमोर पाहिले अन्...
त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता, मृत आकाश दिलीप तायडे (वय 28 रा. अमानी, ग्राम अमानी, मालेगाव) येथील असल्याचे समोर आले. अधिक तपासावरून पोलिसांनी मृत आकाशची पत्नी मायावती हिला ताब्यात घेवून तिची सखोल चौकशी केली. त्यानंतर तिने विवाहबाह्य संबंधांतून पतीचा खून केल्याचे कबूल केले. अमानी येथील सतिष पांडुरंग नालटे याच्यासोबत मायावतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकुण तिचा पती आकाशला लागल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यातून आकाश दारू पिवून मायावतीला मारहाण करायचा.
दरम्यान, आपल्या विवाहबाह्य संबंधातील अडसर दूर करण्यासाठी मायावती, तिचा प्रियकर सतिष नालटे आणि नालटेचा मित्र दीपक रमेश आरूया तिघांनी कट रचला. आकाशला आजारी आहे म्हणून मायावतीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. 9 नोव्हेंबर 2019 ला संध्याकाळी 7 वाजता आकाशला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर पत्नी आकाशला रिक्षातून घेवून जाताना प्रियकर सतिष आणि त्याचा मित्र दीपक या तिघांनी मालेगाव बायपास रस्त्यावर आणले. नंतर रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून आकाशच्या डोक्यावर व गळ्यावर वार केले. आकाशचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून मातमळच्या पुलाखाली फेकून दिला.
हेही वाचा - बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयचं पडलं आजारी, घाणीच्या साम्राज्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष...
आरोपी मायावतीने वरील घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपी पत्नी मायावती आणि प्रियकर सतिषचा मित्र दीपक या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आरोपी प्रियकर फरार असून त्याचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्याचा तपास एसपी डॉ. दिलीप भुजबळ, पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, एलसीबी प्रमुख पीआय महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला गेला.