बुलडाणा - सध्या सुरू असलेल्या वातावरणातील बदलांमुळे शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्दी, घसा दुखणे, ताप अशा रुग्णांमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती शहरातील डॉक्टरांनी दिली.
पाऊस सुरू झाल्यापासून, ढगाळ वातावरणामुळे जंतुसंसर्ग पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, कफ अशा साथीच्या रोगात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर अस्वच्छतेमुळे उलट्या, जुलाब, कावीळ आणि टायफाइडचे रुग्णही पाहायला मिळत आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती आहेत. ज्या रुग्णांना सांधेदुखी आणि दम्याचा त्रास आहे त्यांचा त्रासही वाढला आहे. तसेच, वातावरणातील बदलांमुळे विषाणूजन्य ताप, कणकण, घसा दुखणे, खवखवणे यांसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ज्यांना जुनाट सर्दीचा किंवा अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांचा आजार वाढला आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यासोबतच, हवेतून होणारा विषाणू संसर्ग पूर्णत: टाळणे शक्य नाही, पण असा संसर्ग झाल्यास त्याच्या लक्षणांमध्ये वाढ होण्याआधीच योग्य ती काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात शासनातर्फे 1 जिल्हा रूग्णालय, 3 उपजिल्हा आणि 12 ग्रामीण रूग्णालये, तसेच 1 सामान्य रुग्णालय अशी एकूण 16 रुग्णालये आहेत. यासोबतच, 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे सध्या सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सामान्य रुग्णालयांमधील ओपीडी मध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, याचा सामना करण्याकरीता प्रशासनाच्या वतीने मुबलक औषधसाठा उपलब्ध केला गेला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.
- काय घ्यावी काळजी?
सर्दी, तापाची कणकण जाणवल्यास विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या.
शक्य असल्यास अनावश्यक प्रवास व पावसात भिजणे टाळा.
बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.