बुलडाणा - लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सर्व पक्षांनी सभा, रॅलीच्या माध्यमातून रान उठवले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने मात्र, 'डोअर टू डोअर'चा प्रचाराचा मार्ग अवलंबला आहे. वंचित बहुजन आघाडीचा हाच प्रचार युती आणि महाआघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
युतीचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या प्रचाराकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय राठोड यांच्या सभांचे तसेच रॅलींचे आयोजन करण्यात आले. तर आघाडीने उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचाराकरता राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याही सभा व रॅलीच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे.
तर दुसरीकडे भारिप बहुजन महासंघ व एमआयएम यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अकोल्याच्या बाळापूर येथील आमदार बळीराम शिरस्कार हे बुलडाणा लोकसभेच्या रणांगणात उतरलेले आहे. यांच्या प्रचाराची बाळासाहेबांची मेहकर येथील सभा सोडली तर एकही प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. मात्र, दुसरीकडे बळीराम शिरस्कार यांनी संपूर्ण मतदारसंघात कॉर्नर सभा, गावा-गावात जाऊन प्रत्यक्ष 'डोअर टू डोअर' प्रचार यंत्रणा राबवली आहे. त्यांच्या या प्रचारामुळे युती व आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे.