बुलडाणा - भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा वंचितचे पार्लमैट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी खांमगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड वार्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर करून परवानगी मागितली आहे.
मला देशाचा एक सामान्य सामाजिक नागरिक म्हणून जाण आहे. आमचे सर्वाचे प्रेरणास्थान तसेच गोरगरीब, उपेक्षीत व वंचितांचे कैवारी श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्योग-व्यवसाय व सार्वजनिक वाहतूूक सुरू व्हावी यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे. तसेच आरोग्य विभाग,पोलीस, विभाग, महानगरपालिका व नगरपालिका कर्मचारी यांच्या अपूर्व सेवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. स्वतः राज्यभर दौरा करून जनतेच्या मनातील कोरोनाची भीती दूर करत आहेत. सामान्य जनतेच्या वेदना समजून ते स्वतः प्रामाणिक भावनेने कार्यप्रवण आहेत. समाज जीवन पूर्ववत व्हावे यासाठी आपण सर्वांनी ही सामूूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुध्दा जनतेला आवाहन केले होते की, रुग्णसेवेसाठी स्वईच्छेने ज्या व्यक्तींना वाटत असेल त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यावेळी मला स्वतःच्या पायाला दुखापत झाली, पायाला प्लास्टर लावल्यामुळे मी स्वतः शारीरकदृष्ट्या असमर्थ होतो. इच्छा असुन देखील रुग्णसेवा करु शकलो नाही. आता माझ्या पायाचे प्लास्टर काढण्यात आले आहे. मी, सध्या पूर्णपणे चालूफिरु शकतो.
बहुजन नायक अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन मला ही जनतेची सेवा करावयाची आहे. रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा आहे. आपल्यालाही समाजाप्रती काही देणे लागते त्या अनुषंगाने भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी खांमगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड-१९ वार्डातील रूग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी 19 ऑगस्टला निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनाद्वारे परवानगी मागीतली आहे. यावेळी त्यांच्या सोबत भारिपचे पदाधिकारी तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.