बुलडाणा - केंद्र सरकारने घोषित केल्या प्रमाणे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्याच्या मोहिमेला आज 1 मे महाराष्ट्र दिनापासून शुभारंभ करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष उभारून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना ही लसीकरण देण्यात येत आहे.
जिल्ह्याला मिळाल्या 7 हजार 500 लसी
राज्यामध्ये आणि देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण करणे गरजेचे असल्याने केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना 1 मे महाराष्ट्र दिनापासून लस देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याला 7 हजार 500 लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार आज शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये 18 ते 44 या वयोगटातील अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला. ही लस अत्यंत सुरक्षित असून कोणताही त्रास जाणवत नसल्याची प्रतिक्रिया लस घेतलेल्या लाभार्थ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - बुलडाणा : कोविड रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे हाल; एका रुग्णाचा मृत्यू