बुलडाणा - जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकीच्या अपघातांमध्ये 2 युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी 26 जूनच्या रात्री घडली आहे. नाद्रकोळी येथील 24 वर्षीय ऋषिकेश जंजाळ आणि शेगांव वरवंट येथील 23 वर्षीय गौरव ढंबाळे या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
बुलडाण्यापासून जवळच असलेल्या नाद्रकोळी या गावात बुलडाणा-सैलानी मार्गावर अपघात झाला. शुक्रवारी रात्री ऋषिकेश जंजाळ या युवकाने आपल्या दुचाकीने टिप्परवर धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत शेगाव-वरवट मार्गावर कालखेड फाट्याजवळ वरवट येथील गौरव ढंबाळे याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले असून, बुलडाणा ग्रामीण आणि शेगाव पोलीस तपास करीत आहे.