बुलडाणा - मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी संग्रामपूर येथील दोन तरुणांनी तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ७० फूट खोल विहिरीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ही घटना संग्रामपूर शहरात घडली आहे. सौरभ बावस्कर आणि विकी भटकर असे उपोषणकर्त्या तरुणांची नावे आहेत.
संग्रामपूर येथील शासकीय निवासस्थानाचे सांडपाणी वॉर्ड क्र.७ मध्ये शिरत आहे. त्यामुळे, नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या सांडपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी वॉर्डात नाले बांधकाम, रस्ता बांधकाम आणि माता रमाई घरकूल योजनेचे थकीत पैसे देणे या मागण्यांचे निवेदन नागरिकांनी सर्व शासकीय स्तरावर दिले. मात्र, शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे, समस्येचे गांभीर्य शासनाला पटवून देण्यासाठी वॉर्डातील रहिवाशी सौरभ बावस्कर आणि विकी भटकर या दोन तरुणांनी आगळे-वेगळे उपोषण केले. हे दोघेही काल मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ७० फूट खोल विहिरीत उतरले आणि उपोषणाला बसले. वॉर्ड क्र.७ मधील नागरिकांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: दोनशे उठबश्या प्रकरणात शिक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश