बुलडाणा - नवसाच्या कार्यक्रमात जेवण सुरू असताना दोन गटात वाद होऊन वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. पाहता पाहता तुंबळ हाणामारी होऊन या घटनेत १ जण ठार तर ४ जण जखमी झाले. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये खुल्या मैदानावरील पारधी समाजाच्या वाड्यावर सोमवारी 18 मार्चला रात्री घडली.
जिल्ह्यातील मलकापूर शहरात राहत असलेल्या पारधी आदिवासी समाजातील वाड्यावर एका घरात सोमवारी 18 मार्चला रात्री नवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी दारू पिऊन नवसाच्या जेवणाचा आस्वाद घेत असताना नवसात जेवण करण्यासाठी न बोलवण्यावरून दोन गटात वाद होऊन सशस्त्र हाणामारी झाली. या हाणामारीत लावऱ्या अजमास पवार (वय २० वर्ष राहणार अंजनगाव जिल्हा अमरावती) या युवकाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बुलडाणा येथे उपचार करून या जखमींना आज सकाळी अकोला येथील रुंग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.