बुलडाणा - बुलडाण्यातील एका 75 वर्षीय रुग्णाच्या एकाच स्वॅबमधून दोन वेगवेगळे अहवाल आल्याचा प्रकार घडला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून त्याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाजेर काझी यांनी केली आहे. तर या रुग्णाचे नमुने नागपूरला किंवा मुंबईला पाठवून तपासणी करण्यात यावी आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी केली आहे. बुधवारी 'ईटीव्ही भारत'ने हे प्रकरण समोर आणले होते.
नागपूरच्या कामठी येथील असलेल्या आणि सध्या बुलडाण्यात अडकलेल्या तबलिगी जमातच्या 11 सदस्याच्या कोरोना चाचणीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील एका 75 वर्षीय रुग्णाच्या अहवालामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. या रुग्णाच्या एकाच स्वॅब नमुन्यातून कोरोनाचे दोन वेगवेगळे चाचणी अहवाल अकोल्यावरून प्राप्त झाले. यातील एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह आला आहे.
एकाच स्वॅबवरून दोन वेगवेगळ्या तज्ञांनी केलेल्या चाचणीचे अहवाल वेगवेगळे आल्याने कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये जबाबदारीने चाचणी केली जाते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकाच स्वॅबच्या नमुन्यावरून एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह अहवाल येणे हा प्रकार अंत्यत गंभीर प्रकार आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. नाजेर काझी यांनी केली आहे.
या रुग्णाचे नमुने नागपूरला किंवा मुंबईला पाठवून तपासणी करण्यात यावी आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आजाद हिंद संघटनेचे अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी केली. या प्रकरणामुळे बुलडाण्यात गोंधळ उडाला आहे.