बुलडाणा - खामगाव तालुक्यातील निपाणा येथे पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय युवा शेतकऱ्याची चाकूने भोकसून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पांडूरंग नारायण अंभोरे असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून जखमी अवस्थेत त्याला खामगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यातल आले होते. परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - बनावट फेसबुक खात्यावरून अश्लील फोटोसह कमेंट टाकून मागितली खंडणी, महिलेस मुंबईतून अटक
खामगाव तालुक्यातील निपाणा येथे पांडूरंग अंभोरे याच्या शेताच्या बाजूलाच पद्माकर शालिग्राम अंभोरे (वय ३०) याचे शेत आहे. पद्माकर यांनी पांडुरंग यास शेतातून विद्युत जोडणी मागितली होती. मात्र, पांडुरंग याने आपल्या शेतातून जोडणी देण्यास नकार दिला. याचाच राग मनात ठेवून पद्माकर हा पांडुरंग सोबत किरकोळ वाद करायचा. रविवारीही पद्माकरने जुन्या वादातून पुन्हा भांडण करत शिविगाळ केली. पद्माकरने पाठीमागून पांडूरंगच्या डोक्यावर आणि पाठीवर चाकुने वार केले. या घटनेत पांडुरंग गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खामगाव सामान्य रूग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - बुलडाण्यात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
या घटनेची माहिती मिळताच खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र लांडे, रविंद्र कन्नर यांच्यासह पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मृत पांडूरंगच्या वडिलांनी पिंपळगाव राजा पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पद्माकरच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेनंतर फरार आरोपी पद्माकरला अटक करण्यासाठी पथक रवाना करत त्याला नांदुरा येथून अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस करत आहेत.