बुलडाणा - ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून नि:स्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज बुधवारी 4 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांची प्रकृती मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे अत्यवस्थ झाली होती.
मेडिकल टीमचे शर्थीचे प्रयत्न
कुठल्याही रुग्णालयात दाखल होण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेट-अपसह ट्रिटमेंट करण्यात येत होती. काल मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला. मेडिकल टीमने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. आज सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान या दुःखद घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे शेगावात दाखल झाले.
अनेक सेवाकार्याची उभारणी
‘सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार निःस्वार्थीपणे श्रद्धापूर्वक त्यांनी काम केले. वयाच्या अठराव्या वर्षी शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्रीनुसार काम करत त्यांनी मंदीर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले. कुठलाही मोबदला न घेता संपूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने काम करणारे मंदिरातील हजारो सेवाधारी, डोनेशनसारख्या आर्थिक लाभाला डावलून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या संस्थानच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, भक्तनिवास, जागतिक किर्तीचा आनंदसागर प्रकल्प आणि अशा अनेक सेवाकार्याची उभारणी शिवशंकरभाऊंनी केली.
नि:स्वार्थ सेवा
श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची नि:स्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ज्ञ, नियोजन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. असा हा कर्मयोगाचा दीपस्तंभ आज अकाली विझला आहे. शिवशंकरभाऊंच्या अकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देवेंद्र फडणवीस
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगीसुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांती.
नितीन गडकरी
श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. भाऊ हे एक व्रतस्थ आणि कर्मयोगी होते. श्री गजानन महाराज संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक आणि धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ कायम स्मरणात राहतील.