बुलडाणा - मलकापुरातील एका तृतीयपंथीयांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात विदर्भातील विविध जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी जमवून गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी (दि. 17 मे) समोर आला आहे. अचानकपणे पोलीस ठाण्यात झालेल्या गोंधळामुळे खळबळ उडाली होती. बऱ्याच वेळानंतर सायंकाळी सर्वांची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र, तृतीयपंथीयांचा पोलीस ठाण्यात गोंधळ करत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव आदी जिल्ह्यातून आले होते तृतीयपंथी
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगरमध्ये राहत असलेल्या मोगराबाई तृतीयपंथीयाच्या घरी 7 मे रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवून, मारहाण करत 50 हजारांची रोकड, बँक पासबूक, आधारकार्ड व दागिने, असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेला, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. यात काही संशयितांची नावे सांगितल्यानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करत तक्रारदार मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील अनेक तृतीयपंथीयांच्या कानावर टाकली. त्यामुळे सोमवारी (17 मे) रोजी नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव आदी जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांनी मलकापूर गाठून मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करण्याची करण्याची मागणी केली. मात्र, मागणी करण्याची पद्धत वेगळीच असल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. सुमारे एक तास चाललेल्या या प्रकारात पोलिसांनी सर्वांची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र, तृतीयपंथीयांचा पोलीस ठाण्यात गोंधळ घालत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - बुलडाणा; अन् आजोबा हिंमत हरले नाही.. ८५ व्या वर्षी केली कोरोनावर मात...