बुलडाणा- राज्य शासन कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे शासकीय यंत्रणांचा गलथान कारभार उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 31 ऑगस्टला जिल्हा कारागृहातील 8 कारागृह पोलिसांची चाचणी करण्यात आली होती. यापैकी 3 जणांचा अहवाल 3 सप्टेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, आरोग्य विभागाने 9 सप्टेंबरला ही माहिती त्या कर्मचाऱ्यांना दिली. यामुळे कोरोनाबाधित पोलिसांनी 10 दिवस कारागृहात सेवा बजावल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तीनही कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोरोना चाचणी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना कारागृह अधीक्षकांनी सेवा कशी करु दिली हा? प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तीनही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे व कारागृहातील इतर कर्मचारी व कैद्यांची चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला तारेवरची करसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा-कंगनाला न्याय द्या; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 4 हजार 452 वर पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा कारागृहात 31 ऑगस्ट रोजी एकूण 8 कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. नियमाप्रमाणे ज्याचे कोरोनाची चाचणीसाठी स्वॅब घेतल्या जाते. त्या व्यक्तीचा अहवाल येईपर्यंत कोणाच्याच संपर्कात न येता होम क्वारंटाइन किंवा रुग्णालयातील विलगीकरणामध्ये राहणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाचे चाचणी केलेले पोलीस कर्मचारी कारागृहात 31 ऑगस्टपासूनच कर्तव्यावर हजर झाले होते. त्यानंतर या 8 कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल 3 सप्टेंबर रोजी बुलडाणा आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. यामध्ये 28 वर्षीय,38 वर्षीय व 51 वर्षीय कर्मचारी असे तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, असे असतानाही आरोग्य विभागाकडून संबधित कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले नाही. अहवाल येऊन 6 दिवस झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांना अहवालाबाबत कळवण्यात आले.
आरोग्य विभागाने चाचणी करणाऱ्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांकडून अहवाल येईपर्यंत कोणाच्याच संपर्कात न येता गृह अलगीकरणात राहू असे प्रतिज्ञापत्र घेतल्याचे तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत बढे यांनी सांगितले. पॉझिटिव्ह अहवालाची माहिती कळवण्याच्या यंत्रणे अभावी कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना उशिरा कळविण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले.
कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅबचे नमुने घेतल्यानंतरही कारागृह अधीक्षक गुलाने यांनी स्वब घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर कसे होऊ दिले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत अधीक्षक गुलाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांना विचारणा केली. त्यांनी चाचणी केलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर घेण्यासाठी हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना कर्तव्यावर ठेवले, अशी प्रतिक्रिया दिली.