बुलडाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या सावळा येथील शेतातील सोयाबीन सुड्यांना आग लागली होती. या आगीत त्यांचे ३ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले. ही आग राजकीय वैमनस्यातून लावली असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. ज्यांना समोरासमोर लढायची हिम्मत नसते, अशांनीच आग लावण्याचे काम केले आहे, असा कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरी माझा आवाज दाबता येणार नाही, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.
माझ्या शेतात लागलेली आग ही राजकीय वैमनस्यातून असल्याची रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे बुलडाण्यापासून जवळच असलेल्या सावळा या गावी तुपकर यांची शेती आहे. स्वतः तुपकर, त्यांची पत्नी शर्वरी, वडील तसेच भाऊ असे सर्व कुटुंब मिळून शेती पाहतात. यावेळी शेतात सोयाबीन पेरलेली होती. काही दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या सुड्या मांडण्यात आल्या होत्या. तुपकर यांचे वडील चंद्रदास अनेकदा शेतातच थांबतात. १५ ऑक्टोबर रोजी रात्री ते काही कामानिमित्त बुलडाणा येथे मुलाकडे मुक्कामी होते. आरोपींनी याच संधीचा गैरफायदा घेत रात्रीतून सुड्याना आग लावली. बाजूलाच इतर काही शेतकऱ्यांच्या सुड्या आहेत. परंतु त्यांना कुठलीही क्षती पोहचविण्यात आलेली नाही. याचा अर्थ आरोपींनी केवळ तुपकर यांनाच लक्ष्य केल्याचे स्पष्ट दिसून येते. या घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. ज्यांनी कुणी आग लावली, ते भ्याड आहेत. त्यांच्यात समोरासमोर लढायची हिंमत नाही. हे यातून स्पष्ट होत आहे. आम्हाला ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडण्याची वेळ आणू नका, अन्यथा महागात पडेल. असा सज्जड इशारा तुपकरांनी विरोधकांना दिला आहे.
रविकांत तुपकर हे आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणातून ते विरोधकांना आडव्या हाताने घेतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती. त्यातून दुखावलेल्या कुण्या नेत्याने तर हे अग्निकांड घडविले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.