बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील रावळगाव शिवारात जमिनीला ४० फूट खोल भेग पडल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. ४ जुलैला दुपारी झालेल्या पावसानंतर भला मोठा आवाज झाला. पाऊस ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात जाऊन बघितले असता दोनशे बाय दोनशे फुटाचे गोलाकार व्यासाचे ४० फूट खोल मोठे भगदाड जमिनीत पडल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
रावळगाव येथील गजानन मधुकर दाभाडे (गट नं 132, 133) श्रीकृष्ण पांडुरंग रायपुरे (गट नं 134) (संजय नारायण मोरे गट नं 101,102) विष्णू हरिदास रायपुरे (गट नं 126, 127) मध्ये हे गोलाकार भगदाड पडून पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली असुन मजूरही या शेतात काम करण्यास नकार देत आहेत. यावेळी गटविकास अधिकारी मानकर व नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी सदरची बाब गंभीर स्वरूपाची असून याबाबत भूसर्वेक्षण तपासणी विभागाकडे माहिती दिली आहे. शासनाने या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी रावळ यांनी केली.