बुलडाणा - गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह इतरांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी आज शनिवारी 17 ऑक्टोबरला बुलडाण्यातील जिल्ह्यातील अटाळी येथील नेटवर्क सेवा देणाऱ्या एका कंपनीच्या टॉवरवर चढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाम अवथळे यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलन केले.
इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे. तसेच खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे जिओ कंपनीचे इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन टॉवर असून सदर टॉवर हे बेवारस सारखे आहे. तेथे कोणीही सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी नसतात. या टॉवरसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र नसल्याने टॉवरला वीज पुरवठा हा गावातील विद्युत रोहित्रावरून होत असल्या कारणामुळे गावकऱ्याना अंधरामध्ये राहवे लागत आहे. यामुळे टॉवरद्वारे देण्यात येणारी इंटरनेट व टेलीकम्युनिकेशन सेवा कायम विस्कळीत असते. त्यामुळे सदर टॉवरद्वारे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी सदर कंपनीला आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे. जर आठ दिवसाच्या आत सदर कंपन्यांकडून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व टॉवरची तोडफोड करेल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी दिला आहे.