बुलडाणा - केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देऊळघाट येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन स्वाभिमानीचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. तब्बल दोन तास आंदोलन झाल्याने काहीकाळ वाहतूक विसकळीत झाली होती.
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने स्वाभिमानीचे राजू शेट्टी व व्ही. एम. सिंग यांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात देशभर आंदोलनाची हाक दिली होती. देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून 'स्वाभिमानी'च्या वतीने देऊळघाट येथे आज शेतकरी व असंख्य कार्यकर्त्यांसह हा रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
....या आहेत मागण्या
शेतकऱ्यांना २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा देण्यास सरकारने बाध्य करावे, कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी तात्काळ सीसीआयचे खरेदी केंद्र चालू करावे, तसेच संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याची वस्तुनिष्ठ आणेवारी ५० पैशाच्या आत काढण्यात यावी.
केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून, जर सदर मागण्या मान्य झाल्या नाही, तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्र व राज्य सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला. तब्बल दीड तास झालेल्या या रास्तारोकोमुळे बुलडाणा-अजिंठा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
आंदोलनाला 'स्वाभिमानी'चे विदर्भ युवा कार्याध्यक्ष राणा चंदन, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे. रफिक शे. करीम, आकाश माळोदे, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.