बुलडाणा - पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ प्रति हेक्टर 25 हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी आज (बुधवार दि. 23) मोताळा तालुक्यातील परडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतात 'समाधी आंदोलन' करण्यात आले. नुकसान झालेल्या शेतात स्वतःला गाडून घेत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने आधीच मूग आणि उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तुपकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोताळा तालुक्याच्या परडा येथील शेतकरी नारायण भिवटे यांच्या 3 एकर शेतातील नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणी केली. त्यांच्याच शेतात स्वतःला गाडून शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी यासाठी आंदोलन केले. यावेळी पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दरम्यान, येत्या तीन दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून 25 हजार नुसार प्रति हेक्टरप्रमाणे अहवाल सादर करण्यात येईल, असे मोताळा तहसीलदारांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा - नाणार जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नातेवाईक, निलेश राणेंचा खळबळजनक आरोप