बुलडाणा- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या विभागीय आयुक्त पीयूष सिंग, तसेच दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्वत: तपासणी मोहिमेत सहभाग घेत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना दंड ठोठावला.
यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी काही वाहनधारकांना चलान दिल्या. तसेच वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याचे आवाहनही केले. या मोहिमेत २७३ वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, दुतोंडे यांच्या २०१८-१९ कार्यकाळापर्यंत ६ हजार ६०३ वाहनधारकांना ३ कोटी ६२ लक्ष १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
सुट्टीच्या दिवशी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट, अवैध प्रवाशी वाहतूक, विना नोंदणी वाहने, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, सिट बेल्ट न लावणे, अनुज्ञप्ती सादर न करणे, विमा सादर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या गुन्ह्यांतर्गत सदर कार्यालयाने चार पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात खामगांव ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व इतर मार्गांवर एकून २७६ वाहन धारकांवर कारवाई केली.
तपासणी मोहिमेत बुलडाणा-चिखली-दे.राजा रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, संदीप मोरे, वरिष्ठ लिपिक गजानन तनपुरे, कनिष्ठ लिपिक प्रविण मुंगळे, अनंता सोर यांचा समोवश होता. तर नांदुरा खामगांव-कलोरी फाटापर्यंत मोटार वाहन निरीक्षक संदीप तायडे, संदीप पवार, वरिष्ठ लिपिक संतोष घ्यार, कनिष्ठ लिपिक विजय माहुलकर, अमोल खिरोडकर यांनी तपासणी मोहीम राबविली. तसेच, नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक संताजी बर्गे, अविनाश भोपळे, वरिष्ठ लिपिक सुनील सोळंकी, कनिष्ठ लिपिक राजेश काळे, मिलिंद उईके यांनी तर, चिखली खामगाव महामार्गावर मोटार वाहन निरीक्षक फारूक शेख, वरिष्ठ लिपिक सुनील सुर्यवंशी, कनिष्ठ लिपिक रोहीत काळे यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतला.
हेही वाचा- जन्मदातीने भरथंडीत रस्त्यावर सोडले, मुलगा गमावलेल्या दाम्पत्यांनी दिली मायेची उब