बुलडाणा - जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान संजयसिंह राजपूत यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत गोळीबार करून पोलिसांनी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या लहानग्या मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी राजपूत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता.
जवान संजयसिंह राजपूत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार संजय राजपूत हे ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने औरंगाबादेत आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने मलकापूर येथे नेण्यात आले. दुपारी ३ वाजता त्यांचे पार्थिव मलकापूर येथे पोहोचले. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत लाखो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या घरोसमोरील मैदानात त्यांना सीआरपीएफ दल तसेच स्थानिक पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी वीर संजय राजपूत यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
वीर जवान संजय राजपूत यांना हजारों नागरिकांनी साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी नागरिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन रोष व्यक्त केला.