बुलडाणा - मलकापूर गावातील वस्तीतून पकडलेले विषारी व बिन विषारी साप जंगल परिसरात न सोडता थेट शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार २९ एप्रिलला घडला आहे. यासंदर्भात त्या सर्प मित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब समोर आली. या सर्पमित्राच्या या प्रकाराला काय म्हणावे असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
साफ-सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने प्रकार आला समोर -
शहरातील मध्यभागी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत कोविड केअर सेंटर असून या सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाताता. अनेक जण येथे कोरोना चाचणीकरता दिवसभर रांगेत उभे असतात. अशा गंभीर परिस्थितीत शहरातील एका अक्रम नावाच्या सर्पमित्राने उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात काही विषारी व बिन विषारी सर्प पिशवीत आणून सोडले. हा प्रकार सुरू असतानांच उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी परिसराची साफसफाई करत होते. एकामागून एक काही साप त्यांच्या निदर्शनास पडले असता त्यांनी एवढे साप कसे निघत आहेत, या बाबीचा शोध घेत पाठीमागच्या परिसरात गेले असता हा अक्रम नामक तरूण तेथे साप असलेल्या पिशवींसह आढळून आला. त्याला कर्मचाऱ्यांनी हटकले व संतापही व्यक्त करून सोडलेले साप त्याला पुन्हा थैली बंद करायला लावले.
शहरातील दाट वस्तीत अथवा कोठेही साप निघाल्यास हा तरुण सदर साप पकडतो व या सापांना जंगलात सोडून न देता या सापांना तो घरी पिशवीत गोळा करून ठेवतो. यानंतर मिळेल त्या सोयीच्या ठिकाणी सोडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोडण्यात आलेल्या वीस ते पंचवीस सापांपैकी काही विषारी तर काही बिनविषारी साप होते. महत्त्वाचे म्हणजे यातील आठ ते दहा साप मृतावस्थेत होते. काही अर्धमेल्या अवस्थेत होते. त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर यातील काही जिवंत असलेले विषारी साप त्याला कर्मचाऱ्यांनी पिशवीत भरण्यास भाग पाडले. ते साप कर्मचाऱ्यांनी शेत शिवार परिसरात नेऊन सोडले, तर मृत असलेल्या सापांना जमिनीत गाडून टाकले. तसेच त्यांनी येथे आता दिसू नकोस अशी तंबी त्या सर्प मित्राला दिली. दरम्यान या विकृत सर्प मित्रावर काय कारवाई होते हे पाहणे आता औत्सुक्याचे झाले आहे.