बुलडाणा - चिखली शहरातील 16 भूखण्डावर सौंदर्यकरण करण्यासाठी कोट्यावधी रूपयाच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईट आंदोलन करण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यधिकारी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच जोपर्यंत मुख्याधिकारी यांना निलंबित करीत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका उपजिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी घेतली होती.
विकास कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप
चिखली शहरातील 16 ठिकाणी भूखंड आहे. या भूखंडावर सौंदर्यीकरण तसेच इतर विकास कामे करण्यासाठी 134 कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला होता. मात्र, झालेल्या विकास कामांचा दर्जा निकृष्ट व अर्धवट असलेल्या स्थितीत असून मुख्याधिकारी अभियंता आणि ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडून पूर्ण बिल काढले असल्याचा आरोप बोर्डे यांनी केला आहे. तसेच या अधिकारी ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करावी या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यानी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. दोषींवर कारवाई न केल्यास मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला होता. तहसीलदारांकडून दिलेल्या पत्रात तक्रारीं संबंधी चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर तक्रारीत दिलेल्या मुद्द्यावर उद्यापासून पंचनामे करण्यात येईल असे मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे