बुलडाणा - महायुतीतील घटकपक्षांना भाजप-सेनेने युतीतून डावल्याने बुलडाण्यात घटकपक्ष नाराज आहेत. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात नाराज घटकपक्ष बंड करण्याच्या पवित्र्यात असून याबाबत शुक्रवारी २२ मार्चला घटक पक्षांची पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे.
बुलडाणा लोकसभा महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचा विजय निर्धार मेळावा नुकताच चिखली येथे पार पडला. महायुतीतील घटकपक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपुत, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदिप गायकवाड, तसेच रीपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी यावेळी हजर होते. मात्र, तेथे त्यांच्या पक्षांना सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. फक्त भाजप-सेनेचे झेंडे आणि फलकांवर त्यांच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. घटक पक्षांच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले नव्हते. त्यामुळे या मेळाव्याकडे घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
दरम्यान, आज बुलढाणा येथे या नाराज असलेल्या घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी युतीच्या उमेदवारा विरोधात बंड करत बैठक घेतली. येत्या २५ मार्चला महायुतीत सहभागी असलेल्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकरत्यांची बैठक घेऊन भुमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, युतीच्या उमेदवारा विरोधात घटक पक्षाचा उमेदवार उभा करणार असल्याची भूमिका बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना-भाजप घटक पक्षांना विचारात घेऊन चालत नसल्याने आणि सन्मानजनक वागणुक मिळत नसल्याने या चारही घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या सुर उमटला. बुलडाणा येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या निवासस्थानी या घटक पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठाक पार पडली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेत याबाबत २५ मार्चला पुन्हा बैठक घेऊन लवकरच उमेदवार उभा करण्यासंदर्भात निर्णय घेऊन पुढील भुमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळाली.
नाराज असलेल्या घटक पक्षांकडुन सुद्धा उमेदवार उतरवला जाऊ शकतो, अशी शक्यता ही नाकारता येत नाही. यात सर्वात महत्वाचे म्हणजे रासपकडून सुभाष राजपूत हे येत्या २६ मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव याना प्रचारासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण या मतदार संघात रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटनेचेही काम असून त्यांच्या मागेही मतदार आहेत. त्यामुळे याचा फटका जाधव याना बसणार असल्याची चिन्हे आहेत.
घटक पक्षांची बैठक झाल्याचे माहीत पडले असता शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती मिळाली आहे. मात्र, हे घटक पक्षाचे पदाधिकरी ऐकण्याच्या मानसिकतेत नसून येत्या २५ मार्चला काय निर्णय होईल याकडे आता लक्ष लागून आहे.