बुलडाणा - संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचे रविवारी मलकापूर शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत सर्व तेली समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकाराम महाराजांनी विशद केलेली तुकारामगाथा ज्यांनी लेखणीबद्ध केली ते मुळ तुकाराम गाथेचे लेखनिक श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मलकापुरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सकाळी संताजी महाराज यांच्या रथाचे पूजन करून समाजाच्या जेष्ठ मार्गदर्शकांद्वारे ही शोभायात्रा काढण्यात आली. टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रेची मिरवणूक काढून मंगल गेट ते लखाणी चौक, गजानन महाराज मंदिर, निमवाडी चौक, तहसील चौक, गाडगे महाराज पुतळा, चांडक शाळामार्गे संताजी भवन येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर संताजी भवन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - दिव्यांग महिला बलात्कार व हत्या प्रकरण : आरोपीस 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
या भव्य मिरवणुकीत तेली समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे आकर्षक देखावे, घोडे, संताजी महाराजांचा भव्य रथ तसेच महाराजांचा त्रिघुनात्मक घानाचा देखावा हा मुख्य आकर्षण ठरला. शहराच्या ज्या भागातून मिरवणूक निघाली त्या मार्गावर कचरा होणार नाही याची विशेष दक्षता आयोजकांमार्फत घेण्यात आली होती. श्री संताजी नवयुवक मंडळाद्वारे मलकापूर शहरात सदर मिरवणुकीसाठी सर्व समाज बांधवांचा व माता भगिनींचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा - बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय
मिरवणूक निघणाऱ्या मार्गावर विविध ठिकाणी रांगोळी काढून मिरवणुकीचे नागरिकांच्या वतीने स्वागत व श्री संत संताजी महाराज यांच्या रथाचे मनोभावे पूजन करण्यात आले. या भव्य जयंती मिरवणुकीत सर्व तेली समाजबांधव, माता भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा - बुलडाण्यात खड्ड्यात केक कापून वाढदिवस साजरा, प्रशासनाचा निषेध