बुलडाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रत्येक प्रचार सभेत युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना दिसले. सहकार महर्षी दिवंगत भास्कराव शिंगणे आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कुटुंबावर प्रतापराव जाधवांनी खालच्या स्तरावरील टीका केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरून डॉ. शिंगणे हे तुपकरांच्या माध्यमातून मतदारांना भावनिक साद तर घालत नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.
प्रतापराव जाधव यांनी दिवंगत भास्कराव शिंगणे आणि डॉ. शिंगणेच्या कुटूंबियांवर खालच्या स्तरावर केलेले वक्तव्या संदर्भात एकही पुरावा डॉ. शिंगणे किंवा त्यांच्या समर्थांकडून समोर आलेला नाही. तर युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी देखील सहकार महर्षी दिवंगत भास्कराव शिंगणे हे माझ्यासाठी सन्मानीय, आदरणीय होते आणि राहतील जनतेने या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन केले केले आहे.
दुसरीकडे प्रतापराव जाधव यांच्या कुटूंबियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जाधव यांच्या समर्थकांनी निवडणूक विभागाकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र, राजेंद्र शिंगणे यांच्याकडून कुठल्याच प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नसल्याने शिंगणेकडून मतदारांना फक्त भावनिक साद घातली जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर प्रतापराव जाधवांनी माझ्या कुटूंबियांवर केलेले खालच्या स्तरावरील वक्तव्याचे पुरावे विशिष्ट वेळी सादर करू असे डॉ. शिंगणेकडून सांगण्यात येत आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. शिंगणे व शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्यामध्ये लढत होत आहे. शिवसेनेचे प्रतापराव जाधव गेल्या १० वर्षांपासून खासदार आहेत. बुलडाण्यामध्ये उमेदवारांना पाहून मतदान करण्याची शैली नसुन फक्त भावनिक मुद्द्यावर निवडणूका होत असतात. आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून व त्यांच्या समर्थांकडून डॉ. शिगणेंचे वडील सहकार महर्षी दिवंगत भास्कराव शिंगणे यांच्या कुटीबीयांवर खालच्या स्तरावर प्रतापराव जाधवांवर आरोप करून भावनिक लाट तयार करण्याची साद करण्यात येत आहे.