बुलडाणा - शहरात मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले. नगर पालिकेने नाल्यांची साफ-सफाई न केल्याने ही वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
बुलडाण्यात मंगळवारी 2 जुलै रोजी दुपारी 3:30 पासून दोन तास संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरात ठीक-ठीकाणी पाणी साचले तर बस स्थानक जवळील एसटी बस कॉम्प्लेक्स मध्ये तळमजल्यातील सर्व दुकानांमध्ये पाणी साचले. या साचलेल्या पाण्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नगरपालिकेने वेळेतच नाल्यांची साफ-सफाई न केल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांनी केला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी 28 जून ते 2 जुलैपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात 25 ते 50 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. आज मंगळवारी 2 जुलै रोजी बुलडाण्यासह आसपासच्या परिसरात दुपारी दोन तास जोरदार पाऊस पडला. या पावसाने परिसराच्या शेतीसह बुलडाणा शहरात मोठ्या प्रमाणात जागो-जागी पाणी साचले. स्थानिक बस स्थानक जवळील एसटी कॉम्प्लेक्समधील तळ मजल्यात टोंगळ्याएवढे पाणी साचले. हे पाणी कॉम्प्लेक्समधील दुकानात गेल्याने सर्व दुकानदारांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तर, नगरपालिकेच्या नाल्यांची साफ-सफाई न केल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याचे स्थानिक दुकानदारांनी म्हटले आहे.