बुलडाणा - कोरोनाला हरवण्यासाठी शरीरातील शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ही शक्ती चिकन, मटन आणि अंडे खाल्ल्याने वाढेल, यासाठी मासाहारी पदार्थ सेवन करा, असे आवाहन बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेला केले होते. या प्रकरणात काही वारकऱ्यांनी गायकवाड यांना फोन करून जाब विचारले व यातून वाद निर्माण होऊन त्याचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. मात्र, या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने आता या विषयाला वारकऱ्यांनी इथेच थांबवावे, असे आवाहन आमदार गायकवाड यांच्याशी मोबाईलवर बातचीत करणारे ह.भ.प. प्रशांत महाराजांनी आज केले.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
आपण कोणत्याही पक्षाचे नसून केवळ एक वारकरी म्हणून आमदार गायकवाडांना फोन केले होते. मात्र, त्या ऑडिओ क्लिप व्हायरल करून राजकारण करण्यात आले असल्याचे दहिकर महाराज म्हणाले. ते आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीसाठी आज बुलडाण्यात आले होते. हिंदू समाजबांधवांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची चिंता व्यक्त करीत मुस्लिमांमध्ये कोरोनामुळे क्रिटिकल होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते सातत्याने प्रोटीनयुक्त आहार घेत असतात. हिंदू समाजात शाकाहारींची संख्या खूप आहे, त्यामुळे त्यांनी चक्क हिंदू समाज बांधवांना मुस्लिमाप्रमाणे दररोज प्रोटीनयुक्त 3 ते 4 अंडे आणि एक दिवस आड चिकन, मटन खाण्याचे आवाहन बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. मात्र, यामुळे वारकऱ्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात येत असून वारकरी आणि आमदार संजय गायकवाड यांच्यात झालेल्या वार्तालापाची ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये मोताळा तालुक्यातील ढोरपगाव येथील प्रशांत महाराज दहिकर यांच्याशी आमदार गायकवाड यांची झालेली चर्चेची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती.
मी माझ्या शब्दावर ठाम - आमदार गायकवाड
तर मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. मी जे बोललो ते आज देशाचे डायट प्लॅन आहे. मांसाहार सेवनाचे आवाहन केंद्र शासनापासून तर राज्य शासन नेहमीच करीत आले आहे. मात्र, भाजपच्या वारकरी सेलकडून या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.
हेही वाचा - औरंगाबाद : पैठणमध्ये वीज विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शहराच्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम