बुलडाणा - ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपली प्रतिक्रिया मध्ये बुलडाण्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी माझ्या प्रति अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी आज शनिवारी 30 जानेवारी रोजी पूर्वश्रमीचे शिवसेनेचे माजी आमदार व सध्या भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी बुलडाणा शहर पोलिसात दाखल तक्रारीद्वारे केली आहे.
बुलडाण्यात अशी चर्चा - मुख्यमंत्री साहेब, 'अजब तुमचे आमदार'
पूर्वश्रमीचे शिवसेनेचे माजी आमदार व सध्या भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी घाटाखालच्या खरबडी, रोहिनखेड, उबाळखेड,उऱ्हा दहिगांव, तळणी या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पक्षाची सत्ता आल्याचा दावा 18 जानेवारीला केला होता. त्याच्यावर बुलडाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना माजी आमदार शिंदेविरुद्ध अश्लील वक्तव्याचा वापर केला होता. त्यामुळे विजयराज शिंदे यांनी त्यांची प्रतिमा खराब व अपमान केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कलम 294, 503, 504, 506 कायदेशीर कारवाई करण्यासाठी बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची नोंद बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीवर करण्यात आली असून तक्रार चौकशीवर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदाराने राजकारणात परस्पर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारे अश्लील वक्तव्य केल्याने 'मुख्यमंत्री साहेब, अजब तुमचे आमदार' अशी चर्चा बुलडाण्यात रंगत आहे.
माजी आमदार शिंदेंच्या दाखल तक्रारीत हे आहेत नमूद
'आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेत यापूर्वीही माझ्याबद्दल अपशब्द वापरले असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर या अश्लील वक्तव्यामुळे माझा अपमान झालेला असून राजकीय व समाजिक क्षेत्रातील माझी प्रतिमा खराब करायचा डाव त्यांच्याकडून रचला आहे. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झालेला असून माझ्या समर्थक व चाहत्यांमध्ये चिड निर्माण झालेली आहे. या प्रकरणी जाहीर निषेध व्यक्त करत संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक व बोराखेडी पोलीस स्टेशनकडे भाजपच्या व माझ्या समर्थकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी याबाबत शांतता व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आमदार संजय गायकवाड यांच्यावर कलम 294, 503, 504, 506 प्रमाणे तत्काळ गुन्हा दाखल करावा, असे माजी आमदार तथा भाजपचे नेते शिंदेंनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बुलडाण्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदेंच्या दाखल तक्रारीवर बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यामुळे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यातील सरपंचपद आरक्षण जाहीर