बुलडाणा - जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोर लघू प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामासह दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. सोमवारी मामा-भाचे तिघेही धरण परिसरात फिरायला गेले होते. ते सायंकाळी घरी परतले नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. नामदेव वानखडे (वय.43), विनायक गाडगे (वय.27), तेजस गाडगे (वय.18) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
तीन ठिकाणाहून आले होते मामा-भाचे -
पुणे येथे नोकरीस असलेला विनायक गाडगे (वय, 27) सध्या टाळेबंदी असल्यामुळे धानोरा येथे घरी आला होता. त्याला सोबती त्याच्या काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय,18) आणि लग्न समारंभाकरता दाताळा तालुका मलकापूर वरून आपल्या बहिणीला घ्यायला आलेले त्यांचे मामा नामदेव वानखडे (वय,43) हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले होते. त्याठिकाणी फिरत असतांना आणि सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी धरणात उतरले. मात्र, रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, ते कुठेच सापडले नाहीत. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली होती. धरण परिसरात शोध सुरू असतांना त्यांचे कपडे, मोबाईल फोन काठावर आढळून आले. मात्र, तोपर्यंत रात्र झाल्याने अंधारात मृतांचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये तिघांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्याठिकाणी पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.