बुलडाणा - कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून आपली प्रतिष्ठाने चोरुन उघडी ठेवणाऱ्या बुलडाणा शहरातील 6 व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच विनाकारण व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध नगर परिषद प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. बुलडाणा शहरातील या 6 व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
कारवाई सुरुच राहणार
शहरात विविध पथकांची नेमणूक करून ही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या भागामध्ये जास्त आहे, अशी जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद क्षेत्र, प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये घोषित केली आहेत.
'नागरिकांनी सतर्क राहून आदेशाचे पालन करावे'
या प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये नागरिकांनी सतर्क राहून आदेशाचे पालन करावे, अशी अपेक्षा असतानाच या प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने केवळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात मुभा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली होती. परंतु बुलडाणा शहरामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून काही दुकानदारांनी आपली दुकाने अर्धवट सुरू ठेवून नियमांची पायमल्ली केली होती. हे लक्षात येताच नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने शहरात विविध पथके तयार केली. शहरातील पार्वती ट्रेडर्स, महावीर आईस्क्रीम पार्लर, चंद्रकला झेरॉक्स, राजमुद्रा ऑनलाइन सेवा केंद्र, श्याम मशिनरी, ओरिएंटल इन्शुरन्स यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय शहरामध्ये विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तिसऱ्या वेळेस दुकाने उघडी आढळल्यास होणार सील
बुलडाणा शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशानंतर दोन दिवसांतच जवळपास 1 लाखाचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध प्रथम 5 हजार रुपये दंड, दुसऱ्यावेळी 25 हजार व तिसऱ्यावेळी हीच दुकाने उघडी दिसल्यास ते सील करण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा नगर परिषद मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.