बुलडाणा - चोरी, घरफोडीच्या औरंगाबाद, जालना, नांदेड येथे विविध पोलीस ठाण्यात तब्बल जवळपास 30 गुन्ह्यातील सराईताला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला बुलडाण्यात झालेल्या घरफोडी, चोऱ्याच्या चौकशीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांकडून बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय 22) असून तो जालना येथील रहिवासी आहे.
विविध पोलीस ठाण्यात आहेत गुन्हे दाखल
बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांनी सराईत असलेल्या जालना येथील सराईत आरोपी टाक याला गेवराईमध्ये घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात अटक केले होते. औरंगाबाद, जालना, नांदेड यासह विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीच्या जवळपास तब्बल 25 ते 30 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गेवराई पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने बुलडाणा शहरात घरफोडी व चोरी केल्याचे सांगितले आहे. याची माहिती गेवराई पोलिसांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिल्यावर मंगळवारी 5 जानेवारी रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी गेवराई येथून त्यास ताब्यात घेतले आहे.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
चौकशीसाठी आज बुधवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास बुलडाणा पोलीस करीत आहेत.