बुलडाणा - समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने बुधवारी सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षण क्षेत्र व अन्य क्षेत्रातील ओबीसी वर्गातील लोकांना पूर्ण आरक्षण देण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
आढाव गल्ली श्री. स्वामी समर्थ केंद्रापासून या विराट मोर्च्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी माणिक चौक, त्रिगुणी गल्ली, जिजामाता राजवाडा बस स्थानक, या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी 'आरक्षण नाही कोणाच्या बापाचे, आहे आमच्या हक्काचे' यासारख्या घोषणा देण्यात आल्या. पिवळे रुमाल, पिवळा ध्वज, झेंडे, पताका घेऊन निघालेला ओबीसी बांधवांचा हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला. येथे तहसीलदार संतोष कणसे पाटील यांना ओबीसी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या मोर्च्यात महिला व मुलींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार अरुण आगे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.