बुलडाणा - जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या परतीच्या पावसाने ओढला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन, तिळा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांसह विजय न मिळवू शकलेले उमेदवारही व्यथा ऐकण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात विजय प्राप्त करणारे आमदार अॅड. आकाश फुंडकर, डॉ.संजय कुटे, श्वेता महाले, राजेश खेकडे, संजय गायकवाड आदी सर्वांनी स्वागत-सत्कार बाजूला सारून ओल्या दुष्काळाने बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पमचनामे करण्याचे आदेश आमदारांनी दिले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही दिल्या.
हेही वाचा - एक दिवा गोरगरिबांच्या दारी, दिव्या फाऊंडेशनचा पुढाकार
याशिवाय, खामगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनीही शेतकऱ्यांना भेट दिली. निवडणुकीत अपयश आले तरी मतदारसंघातील बहुतांशी शेतकरी आपल्या पाठीशी असल्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे आपले कर्तव्य आहे, अशा भावनेतून त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.