बुलडाणा - घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील ग्रामदैवत श्री रेणुका माता मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. 30 सप्टेंबरला सकाळपासून महिलांनी देवीच्या दर्शनासाठी रांग लावल्याचे दिसून आले. फार पुरातन काळापासून असलेले श्री रेणुकामातेचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून शहराच्या कोणत्याही कोपर्यातून मंदिराचा कळस बघूनच भाविक दर्शन घेतात. पुरातन काळी बचानंद स्वामी यांनी चिखली येथील रेणुकामाता माता मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे बोलले जाते. सुरूवातीला गावातील वतनदार मंडळींकडे या मंदिराची पूर्ण जबाबदारी होती. परकीय आक्रमणापासून तेव्हाच्या वतनदारांनी अनेक वेळा या मंदिराचे संरक्षण केल्याचे बोलले जाते. आजही हे मंदिर पूर्णत : अस्तित्वात असल्याचे भाविक बोलतात. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला चिखलीमध्ये रेणुका मातेची यात्रा भरते.
हेही वाचा - नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर सज्ज; अंबाबाई मंदिर सजले
सध्या सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीदरम्यान दररोज भजन, कीर्तन, रास गरबा, दांडिया, ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुहिक पारायण आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री रेणुकादेवी व बचानंद महाराज संस्थान तर्फे केले जाते. चिखली शहरासह पंचक्रोशीतील व जिल्ह्याबाहेरील हजारो महिला व पुरुष भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. रेणुका माता मंदिर परिसरात प्रसाद फुल जोडी ओटी अशा विविध प्रकारच्या साहित्याने दुकाने सजलेलली आपणास पहावयास मिळतात. घटस्थापने निमित्त पहिल्या दिवसापासून नऊ दिवसापर्यंत भाविक भक्त मनोभावे पूजा अर्चा करतात. यामुळे मंदिरात व परिसरात एक प्रकारे नवचैतन्य निर्माण होते. भाविक भक्तांसाठी संस्थांकडून प्रसाद व फराळाची व्यवस्था 9 दिवस करण्यात येते. रेणुका देवी संस्थान मध्ये विविध अशी कोरीव कामे केलेली पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात टाळ मुर्दुंग व महिला पारायण देखील नऊ दिवस चालू असते. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला नवस देखील केले जातात, अशाप्रकारे भाविक भक्त नवरात्रोत्सव हा मनोभावे पूजाअर्चा करून साजरा करतात.
हेही वाचा - शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; अंबाबाईची त्रिपुर सुंदरी महालक्ष्मी रुपात पूजा