बुलडाणा :- वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्याला खऱ्या अर्थाने आषाढी एकादशीचे डोहाळे लागलेले असतात. अशीच मानाच्या सात पालखी सोहळ्यातील जवळपास ३०९ वर्षांची परंपरा असलेली पंढरीला विठू माउलीच्या भेटीसाठी निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे बुलडाणा शहरांत आगमन झाले. बुलडाणा शहराजवळील राजूर घाट चढत असताना संत मुक्ताबाई पालखीचे सौंदर्य आपण राज्यातील भाविकांना आणि ईटीव्ही भारतच्या खास दर्शकांसाठी.
राजूर घाटातून पालखी चालत असताना विहंगम दृश्य पाहायला मिळते. महत्वाची संत मुक्ताबाईची पालखी वारकऱ्यांसह बुलडाणा शहरात दाखल झाली. श्री संत मुक्ताबाई पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूर साठी मार्गस्थ झाली. आज बुलडाणा शहरात प्रवेश करतांना राजूरचा आठ किलोमीटरचा घाट चढून इथं पोहचली. पालखी घाटातून वळणे घेत असताना तिचे आणि डोंगराचे सौंदर्य वेगळेच दिसत आहे. शहरात आगमन होताच संत मुक्ताबाई पालखीचे शहरात हर्शोल्लासात स्वागत करण्यात आले असून भाविकांनी ठिकठिकाणी मोठ्या भक्ती भावाने मुक्ताइंचे दर्शन घेतले. पालखीचा आज मुक्काम असून उद्या शहराला प्रदक्षिणा घालून पालखी पुढील मुक्कामासाठी निघत आहे.