बुलडाणा - जे देशासाठी महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. यात सूडाचं राजकारण करून शरद पवारांची सुरक्षा हटवण्यात आली असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. त्यांना ती सुरक्षा परत देण्यात यावी, अशा लोकांची सुरक्षा काढून घेणे किती योग्य आहे? असा सवाल पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात ते आले असता पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - मुंबई कस्टम विभागाकडून दीड कोटींचे ड्रोन कॅमेरे जप्त
रोहित पवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून जेव्हा सुरक्षा दिली जाते, तेव्हा ती व्यक्ती केंद्र सरकारमध्ये मंत्री होती का, कोणत्या महत्त्वाच्या पदावर किती वर्ष होती, कोणकोणती पदं भूषवली याचा अभ्यास केला जातो. शरद पवार हे संरक्षण मंत्री होते, दहा वर्ष कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, पवारांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला नक्कीच होऊ शकतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याविषयी वेळोवेळी बोलले आहेत. पवारांची सुरक्षा जर कमी करण्यात आली असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती चुकीची गोष्ट वाटते. अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या. मग अशा लोकांची सुरक्षा काढून घेणे किती योग्य आहे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. जे कोणी नेते असतील, मग ते राष्ट्रवादी, काँग्रेस, जेडीयू, शिवसेना किंवा अगदी भाजपचेही, जर ते देशासाठी महत्त्वाचे असतील, त्यांचं ज्ञान महत्त्वाचं असेल, तर त्यांना सुरक्षा दिली जावी. सूडाचं राजकारण करून चालत नाही. आज अख्ख्या देशामध्ये ठराविकच अनुभवी नेते आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांचा समावेश होतो. पवारांची सुरक्षा जर कमी करण्यात आली असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती चुकीची गोष्ट वाटते, अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या.
भीमा-कोरेगाव प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले कि, भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा मागील दीड दोन वर्ष काहीच केलं नाही. पण या हिंसाचाराचा तपास महाविकास आघाडी सरकारने विशेष तपास पथकामार्फत निःपक्षपणे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन वर्षे झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने खडबडून जागं होऊन हा तपास 'एनआयए'कडे दिला. जर तुम्हाला तपास करून न्याय द्यायचेच होते तर दोन वर्षात दिला पाहिजे होता, जे त्यांनी दिले नाही. असे ते म्हणाले.
बेरोजगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, बेरोजगारीचा प्रश्न फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातून समोर आलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारची विविध धोरणे याला कारणीभूत आहेत. अनेक कंपन्या बंद पडत आहेत. अनेक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ते बंद न पडू देणे हे सरकारची जबाबदारी असते. केंद्र सरकार बऱ्याच धोरणांमध्ये कमी पडल्याचे दिसून येत आहे. गेलेल्या कंपन्या कशा परत येतील आणि जाणाऱ्या कशा थांबतील यावर सरकार काम करत आहे आणि त्यात यश नक्कीच येईल, असे ते म्हणाले.
राज्यात जी जी प्रेरणास्थाने आहेत तिथे जावं अशी माझी इच्छा पूर्वीपासूनच होती. शेगावला येण्याचा योग यापूर्वी आलेला नाही. मात्र, आज येऊन श्रींचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. पुढचे अनेक वर्ष लोकांची सेवा मी करत राहील. इथे अनेक भाविक येत असतात. ज्याप्रकारे ही संस्था आणि हा परिसर स्वच्छ ठेवला गेला आहे. मंदिर स्वच्छ आहे. येथील सर्व सेवाधारी महाराजांची मनापासून सेवा करतात .इथलं वातावरण पाहून मनापासून आनंद झाला, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
आपण गजानन महाराजांना काय साकड घातलं असं विचारल्यावर पवार म्हणाले की, मी इथे येऊन शेतकऱ्यांवर येणारे संकट महाराज दूर करोत आणि महाविकास आघाडीला ताकद देत असताना ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या काही समस्या आहेत, त्या लवकरात लवकर सुटूदे आणि महाराष्ट्राला महा करण्याची ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना येऊ दे, असे साकडे आपण घातल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते रामविजय बुरुंगले, ज्ञानेश्वरदादा पाटील, राष्ट्वादीचे नेते संग्राम गावंडे, देशमुख, विनोद साळुंके आदींची यावेळी उपस्थिती होती.