बुलडाणा : खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यासह इतर समस्या सोडविण्यासाठी आज बुलडाणा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी ठिय्या आंदोलन करत शाळा भरवली. या शाळेत इयत्ता 5 ते 10 वी पर्यंतचे वर्ग असून तुकड्यांची संख्या 16 आहे. या शाळेतील शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी 8 ते 10 शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
'या' आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या : पावसाळ्याचे दिवस असल्याने वर्गखोल्यात पावसाचे पाणी टपकते. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे डेस्क-बेंच नाहीत. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित हे विषय शिकविण्यासाठी शिक्षकही नाहीत. त्यातच कॉम्प्युटर लॅब बंद आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थिनींसाठी शौचालयसुद्धा नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. याकडे राजकीय लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याकरता देखील वेळ नाही. या सर्व समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले आहे.
सुविधांचा फक्त डांगोराच : प्रत्येक जिल्हा मुख्यालयात काही तक्रारी किंवा समस्या असल्या तर तिथे दररोज वर्दळ असते. आपली गाऱ्हाणी इथे प्रत्येक जण मांडत असतो; पण आज बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये कोण्या अधिकारी किंवा शिक्षकांची बैठक नसतानाही स्वत: विद्यार्थ्यांनीच आपली समस्या मांडत येथे शाळा भरवली. एकीकडे प्रत्येकाला शुद्ध पाणी, शौचालय आणि वीज देण्याचा डांगोरा पिटला जातो; पण याच करिता या विद्यार्थ्यांना थेट जिल्हा मुख्यालय गाठून घोषणाबाजी करावी लागत आहे.
ग्रामीण भागात शिक्षकांची वानवा : आज शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, याचा डांगोरा पिटला जातो; पण आजही विशेषत: ग्रामीण भागात शिक्षणाची तर सोडा त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांची काय परिस्थिती आहे याचे झणझणीत अंजन घालणाराच आजचा प्रसंग म्हणावा लागेल. हे बघून तरी राजकीय नेते कुंभकर्णी झोपेतून उठणार का आणि याची दखल घेणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.