बुलडाणा - महाराष्ट्र दिनी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात १५ जवानांना वीरमरण आले. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश आहे. मेहकर येथील राजू गायकवाड तर देऊळगावराजा तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव खर्डे या दोघांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
जवान सर्जेराव खर्डे यांच्या आळंद गावावर या घटनेनंतर शोककळा पसरली. वार्ता कळल्यापासून गावातील एकाही घरात चूल पेटलेही नाही. कमलाबाई या सध्या गावाच्या उपसरपंच आहेत. सर्जेराव यांना एक लहान भाऊ आहे. तो शिक्षण घेत आहे. सर्जेराव खरडे यांच्या पश्चचात आई-वडील, पत्नी, भाऊ व एक ३ वर्षांची मुलगी आहे. सर्जेराव खर्डे यांच्या घरी त्यांची आई कमलाबाई खर्डे आहेत. त्यांचे अश्रूही खूप काही सांगून जात आहेत.
सर्जेराव खर्डे २०११ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातच कार्यरत होते. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या आळंद गावातील २०० च्या जवळपास जवान हे वेगवेगळ्या सैन्यदलांमध्ये कार्यरत आहेत हे विशेष. ग्रामस्थांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून सरकारने यावर तात्काळ कारवाई घेत नक्षलवाद्यांचा बिमोड करावा. तसेच असे हल्ले होऊच नये, यासाठी उपाय योजना कराव्यात, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.