बुलडाणा - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या आत्म्याला आज शांती मिळाली. भारताने असेच हल्ले करावे, त्यामुळे पाकिस्तानची भारताकडे पाहण्याची हिंम्मत होणार नाही. यासाठी देशातील प्रत्येक माता एक नाही तर हजार पुत्र देशासाठी देईल, अशी भावना हुतात्मा संजयसिंह राजपूत यांच्या बहिणीने व्यक्त केली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
दहशतवाद्यांच्या खात्म्याने भविष्यातील ३०० दहशतवादी घटना टळल्याची भावना संजयसिंह यांच्या भावाने व्यक्त केली. हुतात्मा जवान संजयसिंह राजपूत यांचा आज तेराव्याचा कार्यक्रम असल्याने सर्व नातेवाईक आले होते. तेव्हा पाकिस्तानवरील हल्ल्याची बातमी समजल्याने सर्वांना आनंद झाला, अशा भावना राजेश रजपूत यांनी व्यक्त केली. भारताचा अभिमान असून हल्ल्याची बातमी ऐकून मनाला शांती वाटली. तसेच देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक माता आपला पुत्र देईल, अशा भावना सरिता राजपूत यांच्या बहिणेने व्यक्त केली.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार केल्याची सूत्रांनी अधिकृत माहिती दिली आहे. १२ 'मिराज-२०००' लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.