बुलडाणा Manoj Jarange on Reservation : सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांच्या 426 जन्मोत्सवानिमित्त मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधाला, यावेळी त्यांनी आरक्षणावरुन पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. मराठा आरक्षणासाठी आपण आता कोणाकडंही विनंती करणार नाही. आपल्या मनगटाच्या जोरावर आरक्षण मिळवणार असा, इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे : यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसंच आता वारंवार सरकारला आपण विनंती करणार नाही. मागील वेळेस आंदोलन सुरु असताना शिर्डी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. यावेळी त्यांनी कोणताही संवाद मराठा बांधवांसोबत साधला नाही." तसंच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर असताना देखील त्यांनी याबाबत विचारणा केली नाही. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी थेट नरेंद्र मोदी यांना किंवा सरकारला पण आता विनंती करणार नसल्याचं सांगितलंय. तसंच आपण 20 जानेवारीला मुंबईत धडकणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
मनोज जरांगेंच्या विरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईत करणार असलेल्या आंदोलनाला बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना फटकारलंय. ‘मुंबईत आंदोलनासाठी 1 ते 2 कोटी लोक जमा होतील, या भीतीनं आम्ही याचिका दाखल करुन घेऊ शकत नाही. आम्हाला महत्त्वाची कामं आहेत. या विषयाशी संबंधित प्रशासनाकडं जा. आम्ही इथं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बसलो नाही,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना सुनावलंय.
हेही वाचा :