बुलडाणा - पती पत्नीच्या वादातून मद्यधुंद अवस्थेत पती चक्क 100 मीटर उंच असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. त्याला उतरवण्यासाठी प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. सासरच्या काही व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी व पत्नी माहेरून परतण्यासाठी त्याने हा प्रकार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गजानन रोकडे, असे या व्यक्तीचे नाव असून तो सव या गावचा रहिवासी आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बीएसएनएलच्या टॉवरवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चढला. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलीस, महसूल आणि नगरपरिषदेचे अधिकारी दाखल झाले. त्याला खाली उतरण्याची विनंती करू लागले. त्यावेळी त्याने खिशातील पत्नीचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड खाली टाकले. त्यावरून त्याचे नाव गजानन रोकडे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे गाव सव असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती कळविण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने त्याची आई व दोन्ही मुलांना घटनास्थळी आणले. त्यांच्यामार्फत विनंती केली. यासोबतच त्याची पत्नी अनिता माहेरी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे असल्याने प्रशासनाने तिला देखील आणण्याची व्यवस्था केली. त्याचे इतर नातेवाईक आणि प्रशासनाने जवळपास तीन तास त्यांच्यासोबत दूरध्वनीवरून आणि लॉऊडस्पीकरद्वारे संपर्क केला. त्याच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली. तब्बल तीन तासानंतर तो अखेर खाली उतरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला कारवाईसाठी ताब्यात घेतले.