बुलडाणा - राज्यात सर्वत्र प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्व मतदारसंघातील उमेदवार आपल्या प्रचारासाठी गावागावात जाऊन गाठीभेटी घेत आहेत. त्याचप्रमाणे मलकापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार व माजी आमदार चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामवडी या गावात प्रचार करण्यासाठी गेले असता, त्यांना मात्र ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवटी गावकऱ्यांचा विरोध पाहून संचेती यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.
हेही वाचा... आरमोरीत काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल ; राजकिय क्षेत्रात खळबळ
आमदारच उमेदवार.. गावात आले भेटीला पण गावकऱयांनी वाचाला समस्यांचा पाढा
उमेदवार चैनसुख संचेती हे ग्रामवडी गावात येताच ग्रामस्थांनी या गावात विकास केला नाही, म्हणून त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. नांदुरा तालुक्यातील वडी गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, गावाजवळील केदार नदीवर पूल नाही, वाडी ते पोटा रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा ग्रामस्थांनी याबद्दल सांगूनही संचेती यांनी फक्त आश्वासन दिल्याचे गावातील लोकांचे म्हणने होते, यामुळे आमदार संचेती गावात प्रचारासाठी येताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना याबद्दल जाब विचारला.
हेही वाचा... शरद पवार तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे
ग्रामस्थांचा रोष पाहून संचेती देखील हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन देत त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. मलकापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार चैनसुख संचेती हे मागील 25 वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र आमदार निधीतून या गावात एक ही काम न केल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहे.