बुलडाणा - भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने स्थगित करण्यात आलेली महाजनादेश यात्रा शनिवारी २४ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल होत आहे. मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव शहरात ही यात्रा जाणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांची ३ ठिकाणी जाहीर सभा देखील होणार असल्याने सध्या प्रशासन सज्ज झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ५ वर्षातील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली. ही महाजनादेश यात्रा बुलडाणा जिल्ह्यात तसेच मलकापूर मतदारसंघामध्ये ७ ऑगस्ट रोजी येणार होती. मात्र, ६ ऑगस्ट रोजी रात्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. तसेच महाराष्ट्रात सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातल्यामुळे ही सुरू असलेली जनादेश यात्रा काही दिवसांकरीता स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा महाजनादेश यात्रेला प्रारंभ करण्यात आला असून ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव आणि जळगाव-जामोद विधानसभा मतदार संघात दाखल होणार आहे.
या निमिताने मलकापूर, खामगाव आणि शेगाव शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांची शनिवारी २४ ऑगस्ट रोजी ३ ठिकाणी जाहीर सभा ही होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. दुपारी १२ च्या सुमारास जळगाव खान्देश मार्गे ही महाजानदेश यात्रा विदर्भाच्या प्रवेश द्वारावर पोहचणार आहे. मलकापूर येथे ही सभा झाल्यानंतर नांदुरा येथे स्वागत स्वीकारून मुख्यमंत्री खामगाव आणि शेगावात देखील सभा घेणार आहेत.