बुलडाणा - दारू अवैधरित्या विक्रीसाठी नेणाऱ्या आरोपीला सोमवारी २६ ऑगस्टला सायंकाळी मलकापुरात गांधीधाम विशाखापट्टनम एक्स्प्रेसमधून आर. पी. एफ. पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३२० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही दारू भुसावळवरून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात होती.
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भुसावळ आणि मलकापूर रेल्वे पोलिसांनी संयुक्त सापळा रचला. गांधीधाम विशाखापट्टनम गाडी सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास स्थानकावर आली. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीच्या एस. ६ बोगीमध्ये १० ते १२ बॅगमध्ये जवळपास ५५ हजार रुपयांच्या देशी दारूसह आरोपी प्रदीप जनार्धन नेतलेकरला ताब्यात घेण्यात आले. रेल्वे पोलीस वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.