बुलडाणा - जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भेडवळ गावाजळील पूर्णा नदीपात्रात वाळू उपसा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, प्रशासनाने वाळू उपशाची परवानगी दिली असली तरी नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाळू उपसा करणे, शक्य नाही. त्यामुळे भेडवळच्या नावावर वाळू उपसा कोठून सुरू आहे, हा प्रश्न महसूल प्रशासनाला पडला आहे.
हेही वाचा - रस्त्यावर लावलेल्या महाजनादेश यात्रेच्या फ्लेक्समुळे रुग्णवाहिकेला अडथळा...
मलकापूर येथील सुनील हिंगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. भेडवळ येथील पूर्णा नदीत पात्रात दोन्ही बाजूला पाणी असून गट नं.324 ते 326, 309 ते 311 मधील वाळू उपसा करणे शक्य नसतानाही 3 हजार 295 ब्रास वाळू काढण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे वाळू उपसा करणारे पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा करत नसून भेडवळच्या पावत्यावर दुसऱ्या ठिकाणाहून वाळू उपसा करत असल्याचे समोर आले आहे. तर जळगाव जामोद तहसीलदार शिवाजी मगर यांनी या पावत्या जिल्हा प्रशासनाने दिल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - जाणून घ्या.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर काय म्हणतात सातारकर..!
तर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी तलाठी, मंडळ अधिकरी, नायब तहसीलदार हे क्षेत्रीय अधिकारी असून त्यांच्यावर नियंत्रण तहसीलदार यांचे असते. त्यांनीच कारवाई केली पाहिजे ते सक्षम अधिकारी आहेत, असे सांगितले आहे. त्यामुळे सदर तक्रारींवर कारवाई होण्याऐवजी जळगाव-जामोद तहसीलदार व जिल्हा प्रशासन एकमेकांवर टोलवा-टोलवी करत आहेत. त्यामुळे वाळू माफिया आणि तहसीलदारांसह जिल्हा प्रशासनाचे साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.