बुलडाणा - राजकोट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी बुलडाण्यामधील खामगावात येथे दोघांना अटक करण्यात आली. बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडले आहे.
हेही वाचा - चायनामन कुलदीप यादवने वनडेत रचला मोठा इतिहास
शुक्रवारी १७ जानेवारीला सुरू असलेल्या या सामन्यावर सट्टा सुरू असल्याची बातमी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. चांदमारी फैल खामगावातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा सट्टा मोबाईलद्वारे लावण्यात येत होता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नाजीम खान अमानऊल्ला खान (वय 45) आणि शेख इरफान शेख हरुण (वय 30) या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सहा मोबाईल, एक एल. सी. डी, रिमोट, कॅल्क्युलेटर आणि रोख असा एकुण ५३, ५२० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, बुलडाणा डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदिप पखाले, पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पांडुरंग इंगळे, पोलीस नाईक पंकजकुमार मेहेर स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केली आहे.